रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील रामपूर परिसरातील एका हापूस आंबा बागेत जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा सांगाडा सुमारे १२ ते १३ वर्षे वयोगटातील मुलगा किंवा मुलगी यांचा असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह एका निळ्या रंगाच्या बॅगेत ठेवून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, या प्रकरणात त्यांचा वापर झाला असावा, असा अंदाज आहे.
ही घटना सुमारे दीड महिन्यांपूर्वी घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बागेत काम करणाऱ्या एका मजुराला त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला होता; मात्र भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही माहिती दिली नव्हती. अखेर त्याने बाग मालकाला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, सांगाड्यातील हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मृताची ओळख पटविणे तसेच हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
