रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नाचणकर चाळ परिसरात रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत १ किलो २०१ ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याच्या आरोपावरून सूरज परशुराम नंदिवले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत गांजासह एकूण ६० हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बुधवारी (२८ ऑक्टोबर) पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी नाचणकर चाळ परिसरात सूरज नंदिवले (वय २४, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी; मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) याच्याकडे गांजा असल्याची बाब निदर्शनास आली. त्याच्याकडून १ किलो २०१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
संबंधित तरुणाची यापूर्वीही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांच्या पथकाने केली.
रत्नागिरी शहर परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि बेकायदेशीर साठ्याविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नाचणकर चाळ परिसरातील या कारवाईनंतर अमली पदार्थांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
