रत्नागिरी : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा फटका आता जिल्ह्यातील जलसाठ्यांनाही बसू लागला आहे. पाणीसाठ्यांची पातळी झपाट्याने घसरत असून, काही धरणे कोरडी पडल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्ह्याची एकूण पाणी साठवण क्षमता ४१९.०९३ दलघमी असताना सध्या केवळ १८६.७६३ दलघमी पाणी उपलब्ध आहे. एकूण उपयुक्त साठ्याच्या तुलनेत ही टक्केवारी ४४.५६ टक्क्यांवर घसरली आहे. ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे.
दरम्यान, केळंबा, पणदेरी आणि टांगर ही तीन धरणे पूर्णपणे कोरडी पडली असून त्याठिकाणी उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. तळवडे (०.०२%), तेलेवाडी (०.३४%) आणि कोंड्ये (५.७५%) या प्रकल्पांतील पाणीसाठाही अत्यंत नगण्य पातळीवर पोहोचला आहे. अनेक लघु प्रकल्पांमध्ये साठा १० ते २० टक्क्यांच्या दरम्यान असल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
असे असले तरी काही मध्यम व मोठ्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याला तात्पुरता दिलासा मिळत आहे. ओझर धरणात ८४.२४ टक्के, गुहागरमध्ये ८३.५६ टक्के, चिंचवाडीमध्ये ७५.३८ टक्के, तर गडनदी आणि अर्जुना प्रकल्पांत अनुक्रमे ६२.५० आणि ६०.८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र मुचकुंदी प्रकल्पाची पातळी ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने चिंतेत भर पडली आहे.
मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज असून बाष्पीभवनाचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. अनेक भागांत येत्या काही आठवड्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकल्प – पाणीसाठा (%)
ओझर – ८४.२४%
तिवरे – ५६.१२%
गुहागर – ८३.५६%
नातूवाडी – ३८.५६%
चिंचवाडी – ७५.३८%
निवे – २१.३४%
अंबतखोल – ६१.५९%
कोंड्ये – ५.७५%
अर्जुना – ६०.८८%
केळंबा – ०.००%
