रत्नागिरी : यंदा मान्सूनने अपेक्षित वेग न घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून तो केवळ १२ ते १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने ठेवली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सामंत यांनी सांगितले की, दरवर्षीच्या तुलनेत यंदा १५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ दीड टक्का पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या तसेच संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाऊस लांबल्याचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी झालेल्या तुरळक सरींनंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभाग आणि वेधशाळेच्या अधिकृत अंदाजानुसारच पुढील पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ५० लाख रुपयांच्या बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा आढावा घेताना सामंत म्हणाले की, नव्याने विकसित झालेल्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर यंदा भूस्खलनाचा धोका अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या मार्गावर विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात २१ निवारा केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्नही लवकरच साकार होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी महायुतीतील एकजूट अधोरेखित केली. रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन सांघिक पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विधान परिषदेच्या १७ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ११ जागांवरही महायुतीचा विजय होईल, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही खासदाराची स्वतंत्र भेट घेतलेली नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला. निमंत्रण पत्रिकांमधून नावे वगळली जात असल्याच्या तक्रारींबाबत योग्य पातळीवर दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
