रत्नागिरी: राजकीय क्षेत्रातील प्रभावानंतर आता रत्नागिरी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातही ‘सामंत बंधूं’च्या वर्चस्वाची नवी खेळी सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत हे स्वतः शेती विकास संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत असून, सहकार वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उदय सामंत यांनी थेट भाष्य केले नसले, तरी आपण संचालकपदाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या समीकरणांमध्येही सामंत यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे आता संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यातच नव्या सहकार कायद्यातील सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांच्या पात्रतेचा मुद्दा आगामी निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

या नियमाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार, यावर अनेक विद्यमान संचालकांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे अनुभवी संचालकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याबरोबरच जिल्हा बँकेतील जुनी सत्तासमीकरणेही बदलू शकतात. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सहकार कायद्यातील तरतुदींची कायदेशीर चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार किरण सामंत यांनी गेल्या काही महिन्यांपासून सहकार क्षेत्रातील राजकीय मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे चित्र आहे. विविध मतदारसंघांमध्ये विकासकामांच्या निमित्ताने दौरे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क आणि अनुभवी सहकाऱ्यांना मैदानात उतरविण्याची रणनीती यामुळे जिल्हा बँक निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढली आहे.

सध्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात २१ जागा आहेत. मात्र, २०१६ मध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो सहकार विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेमक्या किती जागा असतील आणि मतदारसंघांची अंतिम रचना काय असेल, हे अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

उदय सामंत यांच्या थेट प्रवेशामुळे जिल्हा बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहणार नसून, जिल्ह्याच्या राजकीय सत्तासमीकरणांचीही कसोटी ठरणार आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांचे भवितव्य, नव्या चेहऱ्यांची एन्ट्री आणि अध्यक्षपदाचे गणित याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.