रत्नागिरी : ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडे ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांवरच आता पडदा पडण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल १३१ जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्या आहेत. त्याहून गंभीर बाब म्हणजे याच कालावधीत १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवली असून, विद्यार्थीसंख्येत तब्बल २४ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे ‘गाव तिथे शाळा’ या संकल्पनेसमोरच मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २ हजार ४९४ जिल्हा परिषद शाळा होत्या आणि त्यामध्ये ७३ हजार २३९ विद्यार्थी शिक्षण घेत होते. पाच वर्षांनंतर, म्हणजे सन २०२५-२६ मध्ये शाळांची संख्या २ हजार ३६३ वर, तर विद्यार्थीसंख्या ५५ हजार ५९७ वर येऊन ठेपली आहे. म्हणजेच अवघ्या पाच वर्षांत १३१ शाळा कमी झाल्या आणि तब्बल १७ हजार ६३४ विद्यार्थी शिक्षणाच्या या सार्वजनिक व्यवस्थेतून बाहेर पडले.
गावे रिकामी; शाळांचे पटही ओस
या घसरणीमागे ग्रामीण भागातील झपाट्याने वाढणारे स्थलांतर हे प्रमुख कारण आहे. रोजगाराच्या शोधात कुटुंबे मुंबई, पुणे, रत्नागिरी शहर तसेच औद्योगिक वसाहतींच्या परिसरात स्थलांतरित होत आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये तरुण कुटुंबांची संख्या कमी होत असून, त्याचा थेट परिणाम शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. गावात विद्यार्थीच उरले नाहीत, तर शाळा टिकणार कशा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जन्मदर घटला; नव्या प्रवेशांची संख्याही रोडावली
कुटुंबांचा आकार कमी झाल्याचाही परिणाम जिल्हा परिषद शाळांवर झाला आहे. पूर्वी एका कुटुंबात तीन-चार मुले असण्याचे प्रमाण अधिक होते. आता बहुतांश कुटुंबे एक-दोन अपत्यांपुरती मर्यादित राहिल्याने शाळांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण लोकसंख्येतील हा बदल शाळांच्या भवितव्यावर परिणाम करणारा ठरत आहे.
‘इंग्रजी’च्या आकर्षणापुढे मराठी शाळा पिछाडीवर
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला कल हेही या संकटाचे महत्त्वाचे कारण आहे. मुलांना भविष्यातील स्पर्धेत टिकवायचे असेल, तर इंग्रजी माध्यम आवश्यक असल्याची धारणा पालकांमध्ये वाढत आहे. परिणामी कॉन्व्हेंट आणि खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे प्रवेशाचा ओघ वाढत असताना जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे.
खासगी शाळांच्या झगमगाटापुढे सुविधांचा अभाव
डिजिटल वर्गखोल्या, स्कूल बस, आधुनिक शैक्षणिक साधने आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून खासगी शाळा पालकांना आकर्षित करीत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांना अद्याप मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. स्वच्छतागृह, क्रीडांगण, डिजिटल साधने यांसारख्या सुविधांचा अभाव असल्याने पालकांचा कल खासगी शाळांकडे वळणे स्वाभाविक ठरत आहे.
शाळा वाचवायच्या असतील तर आता ठोस निर्णयाची गरज
जिल्हा परिषद शाळांची घटती संख्या ही केवळ प्रशासकीय आकडेवारी नाही; ती ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या भवितव्याची धोक्याची घंटा आहे. शाळा बंद करण्याऐवजी त्या सक्षम करण्याची गरज आहे. दर्जेदार शिक्षण, डिजिटल वर्ग, इंग्रजी संभाषण कौशल्य, अद्ययावत शैक्षणिक साधने, स्वच्छतागृहे, क्रीडा सुविधा आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले नाही, तर शिक्षणासाठी स्थलांतराची सक्ती वाढेल. त्यामुळे १३१ शाळांना लागलेले टाळे हे केवळ १३१ इमारतींचे बंद होणे नसून, ग्रामीण शिक्षणाच्या संधी संकुचित होण्याचे गंभीर संकेत आहेत. आता प्रशासनाने आकडे मोजण्यापेक्षा ही घसरण थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
शासनाने ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ नये, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने शाळा बंद करण्याऐवजी त्या टिकविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. मराठी माध्यमाच्या शाळा या ग्रामीण समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, त्या बंद होऊ नयेत यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार आणि गावागावातील शैक्षणिक सुविधा कायम ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावेत.-आमदार भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गट
पटसंख्या कमी झाल्याने या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेची समिती येण्यापुर्वीच हा निर्णय घेण्यात आला असून मात्र यापुढील शाळा बंद होवू नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचा विचार सुरु आहे.– नंदकुमार मुरकर.. शिक्षण सभापती जिल्हा परिषद, रत्नागिरी…..
