रत्नागिरी : रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास, बँकिंग क्षेत्राचे ग्रामीण भागापर्यंत विस्तारलेले जाळे, कर्जवाटपातील वाढ, आवास योजनेतील चांगली कामगिरी आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या जोरावर रत्नागिरी जिल्ह्याने जिल्हा निर्देशांक सर्वेक्षणात सलग तिसऱ्या वर्षीही लक्षवेधी कामगिरी कायम राखली आहे. प्रशासन आणि स्थानिक सहभाग यांच्या एकत्रित परिणामातून जिल्ह्याने पुन्हा एकदा विकासातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला रत्नागिरी जिल्हा विस्तीर्ण सागरकिनारे, भरभराटीला आलेला मासेमारी व्यवसाय, आधुनिक बंदरे आणि त्यातून होणारा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यापार यामुळे विशेष ठरतो. फलोत्पादनासाठी राज्यभरात ओळख असलेल्या या जिल्ह्याने आता सर्वांगीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच उद्योगांना चालना देण्याचे प्रयत्नही जिल्ह्यात सातत्याने सुरू आहेत. पर्यटन विकासाच्या विविध योजनांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती प्राप्त झाली आहे.
दहा हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे
दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यावर जिल्ह्याने विशेष भर दिल्यामुळे रत्नागिरीत सुमारे १० हजार किलोमीटर रस्ते विकसित झाले आहेत. त्यापैकी ८ हजार किलोमीटर डांबरी, तर २ हजार किलोमीटर इतर प्रकारचे रस्ते आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील पूल प्रकल्पही प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. दळणवळणाच्या साधनांत १४.४२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
ग्रामीण भागात बँकिंगचा विस्तार
जिल्ह्यात आर्थिक साक्षरता वाढविणे आणि अधिकाधिक नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे यासाठी गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. त्याचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. पूर्वी प्रामुख्याने शहरी भागापुरते मर्यादित असलेले बँकांचे जाळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि सशक्त झाले आहेत.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत रत्नागिरीतील बँकिंग सुविधा अधिक सक्षम असल्याचे निर्देशांक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. उमेद अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला बचत गटांना मोठा आधार मिळाला आहे. बचत गटांना कर्जवाटप वाढवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचा ग्रामीण भागातील महिलांना विशेष लाभ झाल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले.
ठळक बाबी
- दळणवळणाच्या साधनांत १४.४२ टक्के वाढ
- उद्योग आधार योजनेअंतर्गत १६,३०८ उद्योग सुरू
- कृषी व अकृषी कर्जवाटपात वाढ
- २०,४४७ बचत गट सक्रिय
- जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले
- राज्याच्या उत्पादनात जिल्ह्याचा १.२० टक्के वाटा
आवास योजनेतही सरस
पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्याची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत घरे पूर्ण होण्याचे प्रमाण रत्नागिरीत चांगले आहे. तसेच उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाणही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कौशल्यविकास, पर्यटन क्षेत्राला चालना
जिल्ह्यात पर्यटनवृद्धीसाठी ‘सिंधू रत्न समृद्ध’ योजनेअंतर्गत हाऊसबोट सुविधा, थ्रीडी मॅपिंग, मल्टिमीडिया शो, तसेच रत्नदुर्ग येथे शिवसृष्टी उभारणीसारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्रामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते; मात्र त्यात स्थानिकांचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे असते. नागरिकांचा सकारात्मक सहभाग लाभत असल्याने विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात जिल्ह्याला यश येत आहे. यापुढेही जिल्ह्याचा विकास आलेख असाच उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. – मनुज जिंदाल, जिल्हाधिकारी.
