|| सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेतील गटबाजीचा लाभ उठवत राष्ट्रवादी काँग्रेसने बळ वाढवले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये दोन ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सत्ताकांक्षेला वेसण घालण्यात शिवसेनेचे नेते यशस्वी झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यात गेले काही महिने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुरुड येथील परब यांच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कदम यांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा परब गटाचा आरोप आहे. त्याचे पडसाद या निवडणुकांमध्ये उमटले. रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांनी दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पॅनेल उभे केले. त्यावर प्रतिडाव करताना परब यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार संजय कदम यांची शिवसेनेचे गेली काही वर्षे निष्क्रिय झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासमवेत मोट बांधली. महाविकास आघाडीच्या या स्थानिक प्रयोगाचा फायदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.

दापोली नगरपंचायत निवडणुकीत आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला फक्त २ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस (८) व शिवसेना(६) मिळून महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत झाले.

मंडणगड नगर पंचायत निवडणुकीत मात्र आमदार योगेश कदम गटाने १५ पैकी ७ जागा जिंकताना दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला भोपळाही फोडू दिला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस (७) आणि गाव पॅनेल (१) मिळून काठावरचे बहुमत जमून आले.

दोन ठिकाणच्या निवडणूक निकालाचे हे चित्र, दोन बोक्यांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कसा होतो, याबाबत इसापनीतीतील कथेची आठवण करून देतं.

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं, अशी छुपी नीती आमच्याच काही नेत्यांची होती, असा आरोप आमदार योगेश कदम यांनी निवडणूक निकालानंतर केला.

असे रोखले..

शेजारचा सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तो भ्रम आणखी पक्का झाला होता. पण अतिशय मर्यादित मतदारांच्या मतदानातून मिळणारा हा विजय जनमताचा खरा कल दाखवत नाही, हे जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या निवडणूक निकालांनी सिध्द केले. या चारपैकी वैभववाडी नगरपंचायतीत १७ जागांपैकी १० जागा जिंकून राणेप्रणीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. येथे शिवसेनेला फक्त ५ जागा मिळाल्या, तर अपक्षांच्या वाटय़ाला दोन जागा मिळाल्या आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही खोलता आले नाही. पण देवगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत गेल्या वेळी केवळ एक सदस्य असलेल्या शिवसेनेचे या वेळी ८ उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. नितेश राणे यांच्या मतदारसंघातील या नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. तेथे परिवर्तन घडून आले आहे. या यशामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतही भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. येथील १७ जागांपैकी भाजपला ८ मिळाल्या आहेत, तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथील सत्तेची गणिते काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून राहणार आहेत. दोडामार्ग नगर पंचायत निवडणुकीत मात्र शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना शह देत भाजपाने १७ पैकी १३ जागा जिंकल्याने राणेंच्या गटाला एकहाती सत्ता मिळाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri district panchayat elections shiv sena nagar panchayat akp
First published on: 21-01-2022 at 00:04 IST