रत्नागिरी : कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. इयत्ता बारावीसाठी १५ हजार ७१३, तर इयत्ता दहावीसाठी १७ हजार ४४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होईल. दहावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

कोकण विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील रत्नागिरी जिल्ह्यात बारावीची परीक्षा ३८, तर दहावीची परीक्षा ७३ केंद्रांवर होणार आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नाही, अशा बारावीच्या दोन व दहावीच्या चार केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणतणावातून मुक्तीसाठी व शंका निरसनासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली असून मदतीसाठी संदीप शिर्के (९५५२०६४६४०), एन. एस. पाटील (९४०५३३२९३०), भाग्यविधाता वारंग (९४२३२१३२४०) आणि भीमराव येडगे (९४२१०७४५८९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षागृहात किंवा केंद्र परिसरात गैरप्रकार करताना आढळणाऱ्या परीक्षार्थींविरुद्ध मंडळ अधिनियम तसेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट १९८२ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गैरमार्ग करणारे, त्यास मदत करणारे किंवा उत्तेजन देणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

परीक्षेच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीसाठी कोकण विभागासाठी विभागीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात शिक्षणाधिकारी दिपक मेंगाने, चंद्रकांत सूर्यवंशी, किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, डायटच्या प्राचार्य निता कांबळे तसेच महिला भरारी पथकात अधिव्याख्याता दीपा सावंत यांचा समावेश आहे.

याशिवाय विविध विभागांची स्वतंत्र भरारी व बैठी पथके कार्यरत राहणार आहेत. चालू वर्षी जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, डायटचे प्राचार्य व शिक्षणाधिकारी समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.