राजापूर : दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक दिलासा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खरीप हंगामातील पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली जाणार आहे. नव्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच हजारांच्या अग्रीम मदतीच्या लाभार्थी यादीत आपले नाव असणार का, याची उत्सुकता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, लांजा, मंडणगड, खेड आणि चिपळूण या सात तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील पीक नुकसानीचे कृषी, महसूल आणि ग्रामपंचायत विभागामार्फत पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

या पंचनाम्यांमधून जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ८९०.५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, ४४ हजार २९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटल्याने खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम झाला. पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली, तर अनेक ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाली. आधीच वाढलेला शेतीचा उत्पादन खर्च आणि त्यातच घटलेले उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शेतीसाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा, पुढील हंगामाची तयारी कशी करायची, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचबरोबर दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

शासनाच्या नव्या निकषानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये नोंद झालेल्या नुकसानीच्या आधारे लाभार्थी निश्चित होणार आहेत. विशेष म्हणजे, वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अद्याप अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला नसला, तरी ई-केवायसीच्या आधारे त्यांनाही अग्रीम मदतीचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दुष्काळ, घटलेले पीक उत्पादन आणि वाढता शेती खर्च अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत दिलासादायक ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभार्थी यादी कधी जाहीर होणार आणि कोणाच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार, याकडे आता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दृष्टीक्षेपात रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप पीक नुकसान

तालुका – बाधित क्षेत्र (हेक्टर) – बाधित शेतकरी

रत्नागिरी २,४५४ ६,९०८
संगमेश्वर १,८९० ६,७९०
राजापूर १,८२०.५२ ५,२५१
लांजा १,००९ ४,४००
चिपळूण १,६१० ५,१००
गुहागर ७८० ३,४८०
खेड १,५९७ ४,६००
दापोली १,१०० ५,२००
मंडणगड ६३० २,३००
एकूण १२,८९०.५२
४४,०२९