रत्नागिरी : परराज्यातील मद्याची महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी २०२६) धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवा राज्यातच विक्रीस परवानगी असलेल्या ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’च्या १३०० बॉक्ससह एक सहाचाकी कंटेनर ताब्यात घेण्यात आला.

मौजे हातीवले (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित टोलनाका परिसरात, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनातून गोवा निर्मित मद्याची बेकायदेशीर साठवणूक करून राज्यात वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
जप्त केलेल्या मद्यामध्ये ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’चे १३०० कागदी बॉक्स (एकूण ११,२३२ बल्क लिटर) असून, या मद्याची किंमत अंदाजे १ कोटी ३७ लाख २८ हजार रुपये आहे. तसेच टाटा मोटर्स कंपनीचा पांढऱ्या रंगाचा सहाचाकी कंटेनर ( क्र. एमएल ०१ एडी ०१२१) असा एकूण १ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हा रजि. क्र. ०६२/२०२६ अन्वये जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाहनचालक गणेश कुमार पोकरराम (रा. नागणेशियान डूढा, बारमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई) व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक गणेश जाधव तसेच वैभव सोनावले, मलिक धोत्रे (वाहनचालक), मानस पवार, विशाल भोसले, निलेश तुपे व सागर टिकार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती, बेकायदेशीर मद्यसाठा, परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक किंवा बनावट मद्यविक्री आढळल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षकांनी केले आहे. खबर देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.