रत्नागिरी : राज्य सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी अद्याप कागदावरच अडकून पडला आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली, कर्जमाफी मंजूरही झाली; मात्र ‘अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’ आणि ई-केवायसीच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे तब्बल ४,८९९ शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अद्याप जमा झालेली नाही.
जिल्ह्यात एकूण ७,००८ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र त्यापैकी केवळ २,१०९ शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ तयार केला, तर उर्वरित ४,८९९ जणांकडे अद्याप हा आयडीच नाही. दुसरीकडे ३,००२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी ४,००६ जणांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेली मदत तांत्रिक अटींच्या जाळ्यात अडकली आहे.
विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र सातबारा नसणे, जमीन कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावावर असणे किंवा मालकीच्या नोंदी अपूर्ण असणे, अशा कारणांमुळे हा आयडी तयार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, शासनाने लाभ मंजूर करूनही प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, कर्ज खात्याचे पासबुक आणि बँक खात्याचे पासबुक सोबत घेऊन जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. ही सेवा मोफत उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शासनाने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला असला, तरी प्रत्यक्षात तांत्रिक प्रक्रियेचा अडथळा हा लाभाच्या आड उभा राहिला आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ‘घोषणांपेक्षा खात्यात पैसे कधी?’ हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. प्रशासनानेही प्रलंबित फार्मर आयडी आणि ई-केवायसीची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्ज माफिच्या तांत्रिक बाबी दुर करुन शेतक-यांनी आपली कर्ज माफी करुन घेणे आवश्यक आहे. शासनाच्या अटीनुसारच ही कर्ज माफी देण्यात आली आहे. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधिकारी,रत्नागिरी
