रत्नागिरी : राज्यात अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेची झळ आता रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, सरकारी कॅन्टीन आणि क्लबनाही बसणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला जिल्ह्यातील सर्व खाद्य आस्थापनांची तातडीने सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप अशा प्रकारची कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी जिंदल यांनी, “लवकरच रत्नागिरीतही व्यापक तपासणी मोहीम राबवली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उंदीर, झुरळे किंवा अन्य किटकांचा वावर, मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री, वापरलेल्या खाद्यतेलाचा वारंवार वापर, निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा बाबी आढळल्यास संबंधित आस्थापनांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ खासगी हॉटेल्स व रेस्टॉरंट्सपुरती मर्यादित राहणार नसून सरकारी कॅन्टीन, बेकऱ्या आणि क्लब यांचीदेखील कसून तपासणी होणार आहे. दोषी आढळणाऱ्या आस्थापनांचा परवाना निलंबित अथवा कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना यापुढे प्रशासनाकडून कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून देण्यात आले आहेत.
‘या’ त्रुटी आढळल्यास थेट कारवाई
– स्वयंपाकघरात अस्वच्छता
– उंदीर, झुरळे किंवा किटकांचा वावर
– मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री
– वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर
– निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा कच्चा माल
– अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन
