रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम राबवत सात ठिकाणी धडक कारवाया केल्या. या कारवायांमध्ये तब्बल ६ लाख ७ हजार १३५ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) मि. र. महांगडे यांनी दिली.
६० अन्न आस्थापनांची झाडाझडती; बेकरी, हॉटेल्स प्रशासनाच्या रडारवर
जिल्ह्यात अन्नसुरक्षा आणि दर्जा कायम राखण्यासाठी प्रशासनाने ६० अन्न आस्थापनांची सखोल तपासणी केली. यामध्ये दापोली तालुक्यातील १० आस्थापनांचा समावेश असून बेकरी, हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सची विशेष तपासणी करण्यात आली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
पान शॉपवर छापे; केसरयुक्त विमल, आरएमडी सह घातक पदार्थ जप्त
दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील ‘श्री स्टोअर्स’ आणि केळसकर नाका येथील अश्पाक महमुद मनियार यांच्या पान शॉपवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला आणि इतर आरोग्यास घातक अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
फक्त चार अधिकाऱ्यांवर जिल्ह्याची जबाबदारी; तरीही प्रभावी कारवाई
विशेष बाब म्हणजे अन्न व औषध प्रशासनाकडे सध्या केवळ चार अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. खेड, दापोली आणि मंडणगडसारख्या विस्तीर्ण व संवेदनशील भागाची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर असतानाही विभागाने प्रभावी आणि धडक कारवाया करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नियम मोडणाऱ्यांना इशारा!
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेते आणि साठेबाज यांच्यावर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
