राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये जैद मोबाईल शॉपीत चोरी आणि इतर घरफोड्या करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या चौघांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

२० ऑगस्ट २०२४ ला नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री नाटे-बाजारपेठ येथील जैद मोबाईल व इलेक्टॉनिक्स या दुकानाचे शटर हत्याराने उचकटवून दुकानातून एकूण ४९ मोबाईल हॅण्डसेट, टॅब व अन्य साहित्य असा एकूण ६ लाख ८३ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या दुकानाचे मालक नासिर इब्राहिम काझी, रा. जैतापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाटे पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

हेही वाचा – कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरु असताना नाटे परिसरातील कंत्राटी बांधकाम करणाऱ्या काही व्यक्तींकडे केलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी हे कर्नाटक राज्यात व मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी दोन पथके तयार करून कर्नाटक राज्य व मुंबई या ठिकाणी तपासाकरीता पाठविली. या पथकांकडून कर्नाटक राज्य व मुंबई येथे तपास सुरु असताना, कर्नाटक राज्यात एका तपास पथकाने करण हाज्याप्पा पुजारी (वय २६ वर्षे) रा. जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक, राहूल रेड्डी चव्हाण ( वय २४ वर्षे) जि. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक यांचा गुलबर्गा, कर्नाटक येथे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले व मुंबई या ठिकाणी गेलेल्या तपास पथकाने प्रेम सपन कर्माकर (वय २२ वर्षे) रा. मुंबई याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. तसेच या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे, सबन्ना भिमराय कोबळा (वय २४ वर्षे) रा. जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक यास नाटे पोलीस ठाणे हद्दीमधून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र, सरकारच्या अडचणींमध्ये भर पडणार?

या चारही आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण ४ लाख १३ हजार १७७ रु. किंमतीचे ३३ मोबाईल हॅण्डसेट, १ टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.