रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या इंधन तुटवड्याचे गंभीर संकट निर्माण झाले असून, घरगुती गॅसबरोबरच आता पेट्रोल आणि डिझेलच्या वापरावरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार, दुचाकी वाहनांसाठी केवळ २०० रुपयांचे पेट्रोल, तर चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्यात येत आहे. डिझेलचाही पुरवठा अपुरा असल्याने अनेक वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपण्याच्या मार्गावर असून, काही ठिकाणी पंप बंद पडण्याची वेळ आली आहे.
इंधनाच्या तुटवड्यामुळे विविध पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागल्या आहेत. वाहनचालकांना इंधन मिळवण्यासाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीचा अपव्यय होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संकटाचा थेट परिणाम सार्वजनिक तसेच खाजगी वाहतूक व्यवस्थेवर होत असून, बससेवा, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. परिणामी, कामावर जाणारे कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर वाहतूक विस्कळीत झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण होऊ शकते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो. व्यापार, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊन आर्थिक चक्र मंदावण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाने या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
अपुरा पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा होत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. घेतलेल्या गाड्यांचे कर्ज भेडणे मुश्किल होणार आहे. शासनाने हा इंधन पुरवठा सुरळीत नाही केल्यास आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. तासनतास रांगेत उभे रहावे लागत असल्याने बराचसा वेळ धंद्या अभावी निघून जातो. – राजेंद्र महाडिक, रिक्षा व्यावसायिक रत्नागिरी</strong>.
