रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या डंपर अपघाताने परिसर हादरून गेला. जाकादेवी मार्गे खडी घेऊन येणारा दहा चाकी डंपर पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याखाली कोसळला.
या अपघातात केए ३३ बी ०२४३ या डंपरच्या कॅबिनचे मोठे नुकसान झाले असून चालक राऊत राय हे त्यात अडकून गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक, रिक्षाचालक व पोलीस पाटील प्रशांत थूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाकडून मदतीसाठी आर्त हाका येत होत्या.
चालकाचे पाय स्टेरिंगमध्ये अडकून पडल्याने त्यांची सुटका करणे अत्यंत कठीण झाले होते. प्रारंभी हायड्रा मशीनच्या साहाय्याने डंपर हलविण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र वाहनाचे वजन अधिक असल्याने ते निष्फळ ठरले. दोनदा प्रयत्न करूनही यश न आल्याने बचावकार्य अधिकच आव्हानात्मक बनले.
सायंकाळ होताच अंधार पसरला, तरीही ग्रामस्थांनी हार न मानता मोबाईल व टॉर्चच्या प्रकाशात मदतकार्य सुरू ठेवले. अखेर कटर मशीनच्या साहाय्याने कॅबिनचा भाग कापण्यात आला आणि तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
जखमी चालकाला तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर मोरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला आहे. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
