रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरी वस्तीच्या उंबरठ्यावरच कचरा डेपो उभारून रत्नागिरी नगरपालिकेने हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कोकणनगर आणि जेके फाईल्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या चिरेखाणीत गेल्या वर्षभरापासून शहरातील कचरा टाकला जात आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या कचरा डेपोमुळे परशुराम आणि सिद्धिविनायक सोसायटीसह परिसरातील हजारो नागरिकांना दुर्गंधी, धूर आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता सुरू असलेल्या या प्रकारामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील सर्व प्रकारचा कचरा या मोकळ्या जागेतील चिरेखाणीत आणून टाकला जातो. पावसाळ्यात हा कचरा कुजल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. त्यामुळे घरात राहणेही नागरिकांना असह्य होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः कोकणनगर आणि जेके फाईल्स परिसरातील मोठ्या लोकवस्तीला या दुर्गंधीचा थेट फटका बसत आहे. परशुराम आणि सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवाशांनाही या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे.
कचरा जाळून प्रदूषणात भर; धुराचे लोट थेट घरांमध्ये!
पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. कचऱ्याला आग लावल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरतात. हा धूर थेट नागरी वस्तीत शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा विशेष त्रास होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांना दमा आणि श्वसनाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याची तक्रारही करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, कचरा जाळल्यानंतर त्याची राख हवेत उडू नये म्हणून पालिकेच्या पाण्याच्या बंबातून हजारो लिटर पाणी मारले जात आहे. यासाठी पाण्याने भरलेला बंब कचरा डेपोवर उभा करून पाण्याचा मारा केला जातो. एकीकडे जिल्ह्यातील काही भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे कचरा डेपोतील राख नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याची अशी उधळपट्टी सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पाणीटंचाईच्या काळात कचरा डेपोवर पाण्याची उधळपट्टी कशासाठी?
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेसमोरही पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, नागरी वस्तीजवळील कचरा डेपोवर दररोज हजारो लिटर पाणी खर्च केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या तोंडचे पाणी काढून कचरा डेपोतील राख शांत करण्याचा अधिकार पालिकेला कोणी दिला, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
चिरेखाणीचे रूपांतर कचरा डेपोत; परवानगीवरही प्रश्नचिन्ह
नागरी वस्तीच्या अगदी जवळ असलेल्या चिरेखाणीत कचरा टाकण्याचा निर्णयच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संबंधित चिरेखाण मालकाच्या परवानगीने ही खाण कचरा टाकून बुजविण्याचे काम पालिकेकडून केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, अशा ठिकाणी कचरा टाकताना परिसरातील लोकवस्ती, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या कचरा डेपोबाबत वारंवार नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्यात आली. मात्र, आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असतील, तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, असा सवाल ज्येष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत.
पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी
या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिका प्रशासनाबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आमदार उदय सामंत यांना निवेदन देण्यासाठी भेटण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तसेच विषय त्यांना माहिती आहे असेही समजते. नागरी वस्तीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य रहिवाशांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असूनही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने संताप वाढत आहे.
याबाबत अॅड. कल्पलता भिडे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने या प्रश्नावर योग्य भूमिका घेऊन कचरा डेपो हटविण्यासह ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नागरी वस्तीच्या मध्यभागी सुरू असलेला हा कचरा डेपो तातडीने अन्यत्र हलवावा, कचरा जाळण्याचा प्रकार थांबवावा आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणावे, अशी ठाम मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
आता प्रश्न केवळ कचरा डेपोचा राहिलेला नाही, तर हजारो नागरिकांच्या जगण्याचा आणि आरोग्याचा बनला आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासन आणखी किती काळ दुर्लक्ष करणार आणि या गंभीर प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत कधी हस्तक्षेप करणार, याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
