रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील कोतळूक-उदमेवाडी येथे बंद असलेल्या घराच्या बाथरूममध्ये तब्बल १० ते १२ फुटांचा अजगर आढळल्याने परिसरात काही खळबळ उडाली. आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर वन विभागाच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

कोतळूक-उदमेवाडी येथील श्री. बलवंत गोडबोले यांच्या बंद घराची रविवारी सकाळी साफसफाई सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. घर उघडल्यानंतर बाथरूममध्ये मोठा अजगर असल्याचे सौ. दिपाली सचिन ओक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वन विभाग तसेच आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच जय काजरोळकर घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १० ते १२ फुट लांबीचा आणि अंदाजे १४ ते १५ किलो वजनाचा अजगर त्यांनी अत्यंत सावधगिरीने पकडला. बचाव मोहिमेदरम्यान अजगराला कोणतीही इजा होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. या बचाव मोहिमेत समीर ओक, संजय बाधावटे, सुनील भेकरे, पराग नार्वेकर, मंदार गुहागरकर, प्रकाश नार्वेकर, अनू आरेकर आणि सौरभ आरेकर यांनी सहकार्य केले.

पावसाळ्याच्या दिवसांत साप, अजगर आणि अन्य वन्यजीव अन्नाच्या किंवा सुरक्षित आश्रयाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळण्याच्या घटना वाढतात. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता किंवा वन्यजीवांना इजा न करता तत्काळ वन विभाग अथवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.