रत्नागिरी : होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढवलेल्या पोलिसांनी अमली पदार्थ व प्रतिबंधित गुटख्याविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख ९३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सागरी नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात ‘विमल पान मसाला’ आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी धारतळे ते नाटे दरम्यानच्या सागरी महामार्गावर पोलीस गस्त घालत असताना धाऊलवल्ली फाट्याजवळ समोरून येणारी युंदाई व्हेन्यू (एमएच ०८ बीबी ३३०३) ही कार संशयास्पदरीत्या आढळली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता कापडी पिशव्यांमध्ये गुटखा व तंबाखूचे पाकीट लपवून ठेवले असल्याचे उघड झाले.
जप्त मुद्देमालात १९८ नगांचे २२ पॅकेट्स ‘विमल पान मसाला’ (किंमत ३९,२०४ रुपये), १९८ नग ‘तंबाखू किंग पॅक’ (किंमत ४,३५६ रुपये) तसेच अंदाजे ७ लाख ५० हजार रुपये किंमतीची युंदाई व्हेन्यू कार यांचा समावेश आहे. एकूण जप्त मालाची किंमत ७,९३,५६० रुपये इतकी आहे. या प्रकरणी मारुती बापू कोकणे (वय ३७, रा. म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली; सध्या रा. रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात जनहित व आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित असलेला गुटखा बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, दत्तात्रय पाटील, सागर गुरव, नाटेकर, गवाणकर आणि मोगरकर यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ करीत आहेत.
