रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या पुलावर रविवारी (१९ एप्रिल) पहाटे भीषण साखळी अपघात घडला. भरधाव ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून तो थेट सुमारे १५ फूट खोल विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रक (एमएच ०६ बीडी २५५५) पालीहून रत्नागिरीकडे निघाला होता. पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास हातखंबा पुलावर आल्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव ट्रकने प्रथम समोरील आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे ९९१३) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेने आंब्याच्या पेट्या घेऊन वेंगुर्लाहून वाशीला निघालेला टेम्पो पलटी झाला.
यानंतर पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या आयशर टेम्पोला (एमएच ०५ ईएल ०२२७) धडकला. दरम्यान, अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या ईरटीका कार (एमएच ४६ सीआर ९१२३) ला उजव्या बाजूने धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रक थेट पुलाखालील विहिरीत कोसळला.
या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य राबविण्यात आले. ट्रकमधील क्लीनर योगेश गौतम माळी (वय ३२, रा. धाराशिव) तसेच महामार्गावरील कामगार राजू कुमार (वय १९, रा. उत्तर प्रदेश) हेही गंभीर जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो चालक इकबाल याकूब खान (वय ४२, रा. झाराप, सिंधुदुर्ग) आणि ईरटीका चालक विशाल विजय पाटील (वय ३८, रा. रायगड) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या जखमींना तत्काळ नरेंद्र महाराज’ अॅम्बुलन्सच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
