रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उन्हाच्या झळांनी रत्नागिरी जिल्हा अक्षरशः होरपळून निघत आहे. मंगळवारी तापमानाने तब्बल ३९.२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्यानंतर बुधवारी पारा ३५ अंशांवर घसरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक तापमान असल्याचा दावा आणि पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे.

या ‘ऑक्टोबर हिट’चा थेट परिणाम जनजीवनासह विजेच्या मागणीवरही झाला असून, जिल्ह्यातील विजेची मागणी १६० मेगावॉटवरून थेट १८० मेगावॉटवर पोहोचली आहे. एकीकडे विजेचा वापर वाढत असताना दुसरीकडे महावितरणची तब्बल ३८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याने महसुलावरील ताणही वाढला आहे.

जून आणि जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पावसाने दीर्घकाळ ओढ दिली. त्यातच ऑक्टोबरच्या मध्यावर उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांची काहिली होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत उकाड्याचा त्रास जाणवत असून, दिवसा कडक ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि रात्रीही जाणवणारी उष्णता यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील तापमानाने १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावाही केला जात आहे.

वाढत्या तापमानापासून सुटका मिळवण्यासाठी घराघरांत पंखे, एअर कंडिशनर आणि कुलरचा वापर वाढला आहे. परिणामी, जिल्ह्यातील विजेच्या मागणीत अवघ्या काही काळात २० मेगावॉटची वाढ झाली आहे. नियमितपणे सुमारे १६० मेगावॉट असलेली मागणी आता १८० मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, दिवसाच्या तुलनेत रात्री विजेची मागणी अधिक वाढताना दिसत आहे. दिवसभर उन्हाने तापलेल्या वातावरणात रात्रीही उष्णता कायम राहत असल्याने नागरिकांना पंखे, एसी आणि कुलरचा वापर सुरू ठेवावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत वीजवापराचा भार वाढत आहे.

जिल्ह्यात अधिकृतपणे भारनियमन लागू करण्यात आलेले नसले, तरी संपूर्ण राज्यात अपेक्षेपेक्षा अधिक विजेची मागणी वाढल्याने वीज निर्मिती आणि मागणी यांच्यात तफावत निर्माण होत आहे. परिणामी, काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. ही परिस्थिती सुरळीत करण्यासाठी महावितरणचे तांत्रिक पथक सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

वाढत्या वीजवापरामुळे मागणीचा आलेख उंचावत असतानाच महावितरणसमोर थकबाकी वसुलीचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात दरमहा सुमारे १४० कोटी रुपयांची वीजबिल मागणी असते. मात्र, विविध वर्गवारीतील ग्राहकांकडून सुमारे ३८ कोटी रुपयांची वीजबिले अद्याप वसूल झालेली नाहीत.

यामध्ये रस्त्यांवरील दिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी मोठी आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांतील पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल सात कोटी ३९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडील चार कोटी २१ लाख रुपये, तर विविध शासकीय कार्यालये आणि संस्थांकडील सुमारे पाच कोटी रुपयांची वीजबिले प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात महावितरणचे सर्व वर्गवारीतील मिळून सुमारे सहा लाख १० हजार ग्राहक आहेत. ग्राहकसंख्या मोठी असतानाच थकबाकीचा वाढता आकडा कंपनीच्या महसुलावर परिणाम करणारा ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली प्रलंबित वीजबिले वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.

विजेच्या वाढत्या मागणीचे नियोजन करण्यासाठी ग्राहकांनी शक्यतो दिवसा वीजेचा वापर करावा, असे सुचवण्यात आले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत इस्त्री, पाण्याचे पंप आणि इतर अधिक वीज वापरणारी उपकरणे चालविण्याचे नियोजन केल्यास रात्रीच्या वेळेतील विजेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. या वेळेत वीज वापरणाऱ्या काही ग्राहकांना लागू नियमानुसार वीजदरात सवलतीचाही लाभ मिळू शकतो.

एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांची होरपळ सुरू असताना दुसरीकडे विजेची वाढती मागणी आणि थकबाकीचे आव्हान महावितरणसमोर उभे आहे. उन्हाचा तडाखा आणखी किती दिवस कायम राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी विजेचा वापर वाढणार असून, मागणीचे योग्य नियोजन आणि थकबाकी वसुली या दोन्ही आघाड्यांवर महावितरणला प्रयत्न करावे लागणार आहेत.