रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी १ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. त्यानंतर २ ते ५ जुलै या कालावधीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, घाटमाथा आणि कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टी, दरडी कोसळणे तसेच सखल भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, मेढे तर्फे फुणगुस येथे स्थानिक नदीच्या पुराचे पाणी थेट शेतजमिनीत शिरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी संकटात सापडले असून, संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना धीर दिला.
दरम्यान, लांजा तालुक्यातील वेरळ घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. रस्त्यावर मोठे दगड आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली.
संगमेश्वर एसटी स्थानक परिसरातही पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, संपूर्ण आगार चिखल आणि वाहत्या पाण्याने वेढले गेले आहे. प्रवाशांना चिखलातून वाट काढत स्थानकात प्रवेश करावा लागत असल्याने प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे. स्थानक परिसरातील पाणी निचरा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसात मंडणगड येथे सर्वाधिक १३१.५० मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल राजापूरमध्ये ११४.५० मिमी, गुहागरमध्ये १०८.४० मिमी, दापोलीत १०३ मिमी, रत्नागिरीत १०१.६६ मिमी, लांजात ९९ मिमी, खेडमध्ये ८१.४२ मिमी, चिपळूणमध्ये ६३ मिमी आणि संगमेश्वरमध्ये ६०.४१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान ८६२.८९ मिमी, तर सरासरी पर्जन्यमान ९५.८७ मिमी इतके नोंदविण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, गडनदी मध्यम प्रकल्पात ६५.१८ टक्के, अर्जुना धरणात ४७.०४ टक्के, नातूवाडी धरणात ३०.६१ टक्के आणि मुचकुंडी धरणात ३२.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. कोणत्याही धरणातून सांडवाटेने विसर्ग सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असली, तरी सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घाटमार्गांवर खबरदारी घ्यावी तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
