रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी कहर केला. दापोली, खेड, चिपळूण, राजापूर, मंडणगड आणि संगमेश्वरसह अनेक तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते जलमय झाले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, शेती पाण्याखाली गेली, घाटमार्गांवर दरडी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

दापोलीत रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी

दापोली शहरातील केळस्कर नाका पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गुडघाभर पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जालगाव येथील चैतन्यनगर परिसरात पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून घरांसह शेतांमध्येही पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गिम्हवणे परिसरातही पावसाचा मोठा फटका बसला असून शराफत बुरोंडकर यांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.

खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या वर

सततच्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली आहे. रविवारी भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणीपातळी ९.८० मीटर इतकी नोंदविण्यात आली. या नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोकापातळी ७.०० मीटर असल्याने नदी धोक्याच्या वरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेकडो एकर भातशेती जलमय झाली असून नुकतीच लागवड केलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पुराचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून खेड–खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नदीकाठावरील स्मशानभूमी तसेच काही वीटभट्ट्याही पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत.

शिवतर रोडवर कार पुरात वाहून गेली; तिघांचे थरारक बचावकार्य

खेड तालुक्यातील शिवतर रोडवर सैनिक स्कूल, जामगे येथून बाहेर पडणारी लाल रंगाची कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची थरारक घटना रविवारी सकाळी घडली.कारमध्ये एक महिला व दोन पुरुष असे तिघे प्रवास करत होते. गेटवरील सुरक्षारक्षकाने पुढे पुराचे पाणी असल्याने जाण्यास मनाई केली होती. मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कार पुलावरील रेलिंगला अडकली. कारमधील तिघे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य करून तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.

मंडणगडच्या तुळशी घाटात दरड; वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यातील तुळशी घाटात रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड आल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली

चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत अवघ्या सहा तासांत जवळपास पाऊण मीटरने वाढ झाली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) चे २६ सदस्यीय पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झाले असून शहरातील पूरग्रस्त ठरू शकणाऱ्या भागांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे उपस्थित होते.

दरम्यान, चिपळूण पंचायत समिती कार्यालयासमोर मोठे झाड कोसळून खाली उभ्या असलेल्या काही दुचाकींचे नुकसान झाले. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राजापुरात पुराचा विळखा; बससेवा बंद

राजापुरात जवाहर चौकात पुराचे पाणी शिरल्याने एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. चौकातील अनेक व्यावसायिकांच्या टपऱ्या पाण्याखाली गेल्या असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.राजापूर–शिळ–गोठणे–दोनिवडे तसेच राजापूर–गोठणे–दोनिवडे–सौंदळ या मार्गांवर अर्जुना नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहरातील बंदरधक्का आणि गणेशघाट परिसरही पाण्याखाली गेला आहे.
संततधार पावसामुळे ग्रामीण भागात घरे, गोठे आणि झाडांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अतिवृष्टीमुळे कशेळी देवघळी बीच सनसेट पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

नाटे बाणेवाडी येथे भागीरथी काशिनाथ चव्हाण यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले असून पोकळेवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. कातळी गावात अ. रहीम अ. लतिफ सोलकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.पन्हाळे तर्फे राजापूर बौद्धवाडी येथे वीजवाहिनी तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

संगमेश्वरमध्येही पूरस्थितीची शक्यता

संगमेश्वर तालुक्यातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा पावसाची टक्केवारी कमी

जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत गतवर्षी सरासरी ५३.५७ टक्के पाऊस झाला होता. मात्र यंदा याच कालावधीत केवळ ३४.६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असली, तरी हंगामाच्या एकूण सरासरी पर्जन्यमानात अद्याप घट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमी)

मंडणगड – १३२.२५

दापोली – १४९.४२

खेड – १२५.४२

गुहागर – ७१.४०

चिपळूण – १३०.७७

संगमेश्वर – ७९.९१

रत्नागिरी – ५२.७७

लांजा – ८७.८०

राजापूर – १५५.००

एकूण पर्जन्यमान : ९८४.७४ मिमी
सरासरी पर्जन्यमान : १०९.४२ मिमी