रत्नागिरी :  कोकणावर पावसाचे संकट अधिकच गडद होत असून रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. अविरत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत, तर अनेक भागांमध्ये पूर, भूस्खलन आणि जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हवामान विभागाने शनिवार आणि रविवारसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडत धोक्याची घंटा वाजवली आहे. शहरातील मटण मार्केट परिसरात पुराचे पाणी शिरू लागल्याने व्यापारी आणि नागरिकांनी धास्ती घेतली आहे. चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूरमध्येही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने बचाव पथके, बोटी आणि आवश्यक साहित्य सज्ज ठेवले आहे. एनडीआरएफचे तीन अधिकारी, २३ जवान आणि तीन चालकांचे पथक शुक्रवारी रात्री चिपळूणमध्ये दाखल झाले असून त्यांनी संभाव्य पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे.
दरम्यान, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात शनिवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. गणेश मंदिर परिसरात अचानक प्रचंड आकाराचा दगड रस्त्यावर कोसळला. मात्र, कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आणि सांगलीहून आलेल्या काही युवकांनी प्रसंगावधान राखत तातडीने दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मुसळधार पावसाचा आणखी एक फटका खेड तालुक्यात बसला. खेड-खोपी-धामणंद मार्गावरील कासई शिंदेवाडी येथे भलीमोठी दरड कोसळून रस्त्याचा काही भागच वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बसस्थानकाची अवस्था तर पहिल्याच पावसात दयनीय झाली आहे. संपूर्ण बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून मुख्य शेडमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. वेळेत नालेसफाई न झाल्याने आणि नव्या इमारतीसमोरील काँक्रीटीकरण रखडल्याने लाखो रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत बसची वाट पाहावी लागत असून एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, पावसाचा वाढता जोर, फुगणाऱ्या नद्या आणि सातत्याने घडणाऱ्या भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर जलसंकटाचे गडद सावट पसरले आहे. पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

चिपळूण व खेड येथील पुरस्थिती उद्भवण्याच्या आधीच एनडीआरएफचे पथक करण्यात आले आहे. या पथकाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. तसेच या भागाची पाहणी देखील या पथकाने केली आहे. हे पथक २४ तास या ठिकाणी लक्ष ठेवून असणार आहे. नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घ्यावी. आकाश लिगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण.