रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून थंडावलेली अवैध मासेमारीविरोधातील कारवाई बुधवारपासून पुन्हा एकदा तीव्र करण्यात आली आहे. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेची देखभाल व दुरुस्ती पूर्ण झाल्याने प्रशासनाने समुद्रातील गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला असून, बेकायदेशीर एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत धडक मोहीम राबवण्यात येत आहे. ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत ९ एप्रिलपर्यंत एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करणाऱ्या चार नौकांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, गस्ती नौकेच्या दुरुस्तीमुळे ही मोहीम काही काळासाठी स्थगित ठेवावी लागली. आता नौका पुन्हा सज्ज झाल्याने कारवाईला गती देण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने मासेमारीसाठी काही कडक नियम लागू केले असून, त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
एलईडी प्रकाशाच्या साहाय्याने केली जाणारी मासेमारी पूर्णपणे बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. तसेच, १ जानेवारीपासून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतील साडेबारा नॉटिकल मैलांपर्यंत पर्ससीन नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मर्यादेबाहेर मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारची विशेष परवानगी आवश्यक आहे.
यंदाचा मासेमारी हंगाम तोट्यात गेल्याने आर्थिक फटका बसलेल्या काही नौका मालकांनी छुप्या पद्धतीने एलईडीचा वापर सुरू केल्याचे समोर आले आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांनी या प्रकाराविरोधात आंदोलन छेडल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, रत्नागिरीतही कडक पावले उचलण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याची सागरी स्थिती
समुद्रकिनारा : १६७ कि.मी.
एकूण मासेमारी नौका : २९६०
यांत्रिकी नौका : २५६०
मोहीम : ‘ऑपरेशन क्लीन सी’
