रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वात नेण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली असून, संरक्षण, पर्यटन, हरित ऊर्जा आणि स्टील उद्योगातील बहुआयामी प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री  उदय सामंत यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निबे इंडिया लिमिटेडचे संचालक गणेश निबे, एआयआयएफएचे संचालक योगेश मंदानी आणि व्हीआयटी सेमिकॉन्स पार्क लिमिटेडच्या संचालिका ईश्वर्या कन्नन यांची उपस्थिती होती.

मंत्री सामंत यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, विशेषतः संरक्षण क्षेत्र, पर्यटन आणि ग्रीन एनर्जीवर सरकारचा भर राहणार आहे.

७,५०० कोटींचा ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातील एक प्रकल्प राजापूर, तर दुसरा रत्नागिरी येथे उभारला जाणार असून, यामुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

पर्यटनाला नवी झेप; वर्षभरात ‘सी-प्लेन’ सेवा

रत्नागिरीच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी आगामी वर्षभरात सी-प्लेन सेवा सुरू करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी जाहीर केले.

संरक्षण क्षेत्राला बळ; उभारले जाणार अत्याधुनिक शिपयार्ड

संरक्षण क्षेत्राशी संबंधित मोठी औद्योगिक यंत्रणा जिल्ह्यात उभारली जाणार असून, समुद्र किनाऱ्यालगत वाटद परिसरात शिपयार्ड सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे संरक्षण उद्योगासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.

सीएनजी प्रकल्प ठरणार ‘गेम चेंजर’

रत्नागिरीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला सीएनजी प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाचा ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

सेमीकंडक्टर प्रकल्पात फेरबदल

पूर्वी प्रस्तावित असलेल्या ३८ हजार कोटी रुपयांच्या व्हीआयटी सेमीकंडक्टर प्रकल्पाला अमेरिकेतील काही घडामोडींमुळे विलंब झाला असून, प्रकल्पाच्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. आवश्यक तेवढीच जागा या प्रकल्पासाठी देऊन उर्वरित जमीन इतर नवीन उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

रोजगार आणि विकासाचे नवे पर्व

या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्हा औद्योगिक, पर्यटन आणि संरक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करेल. हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.