रत्नागिरी – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना आता विरोधकांपेक्षा स्वतःच्या कट्टर समर्थकाकडूनच मोठे आव्हान मिळाले आहे. हातखंबा जिल्हा परिषद अनुसूचित जाती गटातून उमेदवारी नाकारल्याने परशुराम मारुती कदम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत थेट बंड पुकारले आहे.

हातखंबा गटात कदम यांच्या नावाला प्रचंड पसंती असतानाही अंतर्गत राजकारणामुळे त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. उमेदवारी देण्याचे स्पष्ट आश्वासन देऊनही ऐनवेळी नकार दिल्याने कदम यांची नाराजी टोकाला पोहोचली आणि त्यांनी थेट सामंतांची साथ सोडत अपक्ष मैदान गाठले.

विशेष म्हणजे, उदय सामंत यांचे अनेक जुने कार्यकर्ते आता कदम यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र दिसत असून, हा सामंत यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. अनेक वर्षांची निष्ठा असलेले परशुराम कदम अचानक विरोधात उभे ठाकल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

परशुराम कदम हे यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असून, त्यांनी समाजकल्याण सभापतीपदही यशस्वीपणे भूषविले आहे. अशा अनुभवी व जनाधार असलेल्या नेत्याला डावलल्यानेच ही बंडखोरी उफाळून आल्याचे बोलले जात आहे.

कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरताच त्यांना पराभूत करण्यासाठी सामंत समर्थकांचा एक गट सक्रिय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हातखंबा गटातील ही निवडणूक आता अत्यंत हाय व्होल्टेज बनली आहे.

सामंत विरुद्ध कदम असा थेट सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत असून, या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ९ फेब्रुवारी रोजी लागणाऱ्या निकालानंतर या बंडखोरीचा राजकीय परिणाम किती खोलवर जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

हातखंबा जिल्हा परिषद गटातील प्रमुख उमेदवार :

  • सुयोग नंदकुमार कांबळे – शिवसेना (शिंदे गट)
  • मुकुंद सुजाता यशवंत सावंत – अपक्ष
  • परशुराम मारुती कदम – अपक्ष