रत्नागिरी : जयगड खाडीत देशी नौकेच्या माध्यमातून अवैधरित्या डिझेलची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) सोमवारी मध्यरात्री धडक कारवाई करत अंदाजे ५ हजार ५०० लिटर डिझेल, एक नौका आणि अन्य संशयास्पद साहित्य जप्त केले. या प्रकरणामागे मोठे तस्करी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे सीमाशुल्क आयुक्तालयांतर्गत रत्नागिरी सीमाशुल्क विभागाला काही व्यक्ती मासेमारी नौका अथवा देशी बोटीच्या साहाय्याने तस्करीचे डिझेल बेकायदेशीररीत्या वाहतूक करणार असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकांनी जयगड खाडी परिसरातील उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर कडेकोट नजर ठेवली होती. याशिवाय स्वतंत्र पथकाद्वारे खाडीत जलमार्गावर गस्त घालण्यात येत होती.
दरम्यान, २६ मे रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास पडवे जेट्टीसमोरील खाडीत संशयित मासेमारी नौका अडविण्यात आली. तपासणीदरम्यान नौकेत ड्रममध्ये भरलेले अंदाजे ५५०० लिटर डिझेल आढळून आले. नौकेवर पाच जणांचा कर्मचारीवर्ग असल्याचेही निदर्शनास आले. तसेच नौकेची पाहणी केली असता ती प्रत्यक्षात मासेमारीसाठी वापरली जात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदविला.
प्राथमिक चौकशीत हे डिझेल खोल समुद्रात एखाद्या बार्ज किंवा टगबोटमधून मिळविण्यात आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सीमाशुल्क कायद्यानुसार डिझेल, नौका आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून ते जप्तीयोग्य असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
जप्त केलेल्या डिझेलचे अचूक मोजमाप, किंमत तसेच नौकेचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यास काही कालावधी लागू शकतो. दरम्यान, या अवैध साखळीमागील सूत्रधार, डिझेलचा मूळ स्रोत आणि वापरण्यात आलेली कार्यपद्धती उघड करण्यासाठी सीमाशुल्क विभागाने सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे किनारपट्टी भागातील इंधन तस्करीच्या प्रकारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
