रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथे घडलेल्या गावठी बॉम्ब स्फोटाच्या गंभीर घटनेला सात ते आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे लागले नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवंत गावठी बॉम्ब सापडूनही अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे मंगळवार, १९ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५) या जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या असताना त्यांना संशयास्पद वस्तू दिसली. ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक, श्वानपथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. या तपासादरम्यान तब्बल २५ ते २९ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडूनही तपासात अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. हे बॉम्ब नेमके कोणी तयार केले, कोणत्या उद्देशाने जंगल परिसरात लपवून ठेवले आणि त्यांचा वापर कशासाठी होणार होता, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. या संपूर्ण प्रकरणामागे एखादे मोठे रॅकेट किंवा गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे का, अशीही चर्चा आता स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी परिसर बंद करून तपास सुरू असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात आरोपींपर्यंत पोहोचण्यात अपयश आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होत आहे. ग्रामीण आणि संवेदनशील भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवंत गावठी बॉम्ब साठवले जातात आणि पोलिसांना त्याची कुठलीही माहिती मिळत नाही, ही बाबही चिंताजनक मानली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तरी पोलिसांनी या प्रकरणातील सूत्रधारांचा शोध घेऊन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
