रत्नागिरी: लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण असा दुहेरी सोहळा पार पडला. रत्नागिरीसारख्या शहरात केंद्रीय विद्यालय सुरू होऊ शकत नाही, अशी टीका करणाऱ्यांना प्रत्यक्ष कामातून उत्तर दिले आहे, असे सांगत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीला राज्यातील महत्त्वाचे ‘एज्युकेशन हब’ बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त के. शंकरय्या, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांपैकी एक रत्नागिरीत
“महाराष्ट्रात यंदा मंजूर झालेल्या अवघ्या तीन केंद्रीय विद्यालयांपैकी एक रत्नागिरीला मिळाले आहे. सोमवारी सुरू झालेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवघ्या ७२ तासांत दर्जेदार स्वागतगीत सादर केले. हीच या विद्यालयाच्या गुणवत्तेची पावती आहे,” असे कौतुक पालकमंत्री सामंत यांनी केले.
कायमस्वरूपी इमारतीसाठी ४० कोटी
सध्या टिळक विद्यालयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, नाचणे येथे उभारण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी इमारतीसाठी केंद्र सरकारने तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. केंद्रीय विद्यालयात मातृभाषेला प्राधान्य देत मराठी भाषेचे शिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्यांच्या मुलांचे भविष्य घडविणे हाच या शैक्षणिक दालनामागील उद्देश असून शिक्षणासोबतच औद्योगिक विकासालाही चालना देण्याचा प्रयत्न सुरू असून, ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून कोकणात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय विद्यालयामुळे कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मातृभाषेचे महत्त्व कायम ठेवतानाच जागतिक स्पर्धेसाठी इंग्रजी शिक्षणही आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांनी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, विशेषतः मुलींनी राज्यात आघाडी घेतली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय विद्यालय भविष्यातील संधींची नवी दारे उघडेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमार्फत आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू झाले असून, १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी दररोज किमान एक ते दोन तास देण्याचे आवाहन केले. “पालकांनी मोबाईल बाजूला ठेवून मुलांना वेळ दिला पाहिजे. शिक्षणासोबतच त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी योग्य दिशा देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्वतःच्या बालपणातील आठवणी सांगताना आपण उत्तर प्रदेशातील सुरजपूर गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून, वडील बँकेत लिपिक होते, असे नमूद केले. प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. आई-वडील आणि शिक्षकांच्या परिश्रमामुळेच आज जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचता आले, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोनशिलेचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य अरुणकुमार यांनी स्वागत केले. नगरसेवक, नगरसेविका, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
