रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मृतदेह तब्बल सात तास दाहिनीत अडकून पडला. धक्कादायक बाब म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेला जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, त्याच्या बिघाडाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे मृतकाच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रविवार, २५ मे रोजी कै. वसंत वाकडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि आप्तेष्ट कोकणनगर स्मशानभूमीत जमले होते. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पार्थिव विद्युत दाहिनीत सरकवण्यात आले. मात्र, त्याचवेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि अंत्यसंस्कार प्रक्रिया अर्धवट अवस्थेत थांबली. अशा प्रसंगी तातडीने सुरू होणे अपेक्षित असलेला जनरेटरच बंद अवस्थेत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हा जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त असून त्याची दुरुस्ती करण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप होत आहे. त्यात नेमका बिघाड काय आहे, याची माहिती देण्यातही पालिकेचे अधिकारी असमर्थ ठरल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मृतदेह दाहिनीतच अडकून पडला. तो बाहेर काढण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांना अक्षरशः सात तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर अंत्यसंस्कार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. “जिवंतपणी सुविधा नाहीत आणि मृत्यूनंतरही सन्मानाने निरोप देता येत नसेल, तर हे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे लक्षण आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जनरेटरची तातडीने दुरुस्ती करावी, स्मशानभूमीत कायमस्वरूपी पर्यायी वीज व्यवस्था उभारावी, तसेच या गंभीर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मृतकाच्या नातेवाईकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
कोकणनगर स्मशानभूमीतील या प्रकारामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासन किती बेफिकिरीने पाहते, याचे हे विदारक उदाहरण मानले जात आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत शिवाजीनगर, चर्मालय स्टॉप, मजगांव रोड येथील स्मशानभूमीत प्रेतांचे दहन करण्यासाठी बसविण्यात आलेली गॅस शवदाहिनी दि. २७ मे २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. आवश्यक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहेत. नोंद घ्यावी आणि पर्यायी व्यवस्था वापरावी. असे आवाहन मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद यांनी केले आहे.
