रत्नागिरी : सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवर दिसणारा सुसंवाद आता रत्नागिरीतही ठळकपणे जाणवू लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे, शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे तिन्ही दिग्गज नेते रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात एकत्र आले. त्यानंतर तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने कोकणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी राणे, सामंत आणि तटकरे रत्नागिरीत आले होते. शासकीय विश्रामगृहात तिन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्यानंतर त्यांनी एकाच वाहनातून पुढील प्रवास केला. त्यामुळे या ‘एकत्र प्रवासा’दरम्यान नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

या भेटीबरोबरच महायुतीतील स्थानिक राजकारणातील अंतर्विरोधाचे चित्रही पाहायला मिळाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम हेही शासकीय विश्रामगृह तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी महायुतीतील अन्य नेत्यांची भेट घेतली; मात्र सुनील तटकरे विश्रामगृहात दाखल झाल्यानंतर कदम यांनी त्यांची भेट घेणे टाळल्याचे दिसून आले.दापोली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या प्रसंगाची चर्चा अधिक रंगली आहे.

योगेश कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय मतभेद यापूर्वीही अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी महायुतीचे प्रमुख नेते एकत्र असताना कदम-तटकरे यांच्यातील अंतर कायम राहिल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले.

दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी दापोलीतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केली. “दापोली अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचे माझ्या वाचनात आले आहे. कोकणात कोणतेही रासायनिक किंवा प्रदूषक प्रकल्प येऊ नयेत, हीच कोकणवासीयांची मूळ भूमिका आहे. स्थानिक शेतकऱ्यांचाही या प्रकल्पाला विरोध असल्याची माझी माहिती आहे,” असे तटकरे म्हणाले.

“लवकरच दापोलीचा दौरा करून स्थानिक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यानंतर स्थानिकांची भूमिका थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडेन. अणुऊर्जा ही राष्ट्राची गरज असली, तरी दापोलीला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून तेथे रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. ब्रिटिश काळापासून दापोली थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा सारासार विचार करूनच सरकारने निर्णय घ्यावा,” अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.

एकाच गाडीतून राणे-सामंत-तटकरे यांचा प्रवास आणि दुसरीकडे कदम-तटकरे यांच्यातील अंतर, यामुळे रत्नागिरीतील महायुतीच्या राजकारणाची नवी चर्चा रंगली आहे.