रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय निर्यात व्यवहारात झालेल्या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरजोळे एमआयडीसी येथील जिलानी मरीन प्रॉडक्ट्स या नामांकित मत्स्य प्रक्रिया व निर्यात करणाऱ्या कंपनीची तब्बल १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी मंगलोर येथील कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिलानी मरीन प्रॉडक्ट्स ही कंपनी प्रक्रिया केलेली मत्स्य उत्पादने परदेशात निर्यात करते. संबंधित व्यवहारात मंगलोरस्थित किशोर कुमार अँड कंपनी (एक्सपोर्ट्स) प्रा. लि. ही कंपनी मध्यस्थ (एजंट) म्हणून कार्यरत होती.

या कंपनीचे संचालक श्रीधरन किशोर कुमार यांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान इटलीतील अर्दिमार एस.आर.एल. या कंपनीसाठी २४ टन मत्स्य उत्पादनांची मागणी नोंदवली होती. विश्वासाच्या आधारावर जिलानी मरीनने संबंधित माल इटलीला रवाना केला. मात्र, निर्यातीचा मोबदला मूळ कंपनीच्या खात्यात जमा न करता तो स्वतःच्या फायद्यासाठी वळवून घेतल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात आरोपीने कंपनीची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी कंपनीच्या अकाउंट मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी उशिरा गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१६ (२) (विश्वासघात) व कलम ३१८ (३) (फसवणूक) लागू करण्यात आले आहेत. या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यामुळे स्थानिक निर्यातदार व उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात मध्यस्थांमार्फत होणाऱ्या व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी ‘मंगलोर कनेक्शन’चा तपास सुरू केला असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस दलासमोर या बहुराज्यीय आर्थिक गुन्ह्याचा तपास हे मोठे आव्हान ठरणार आहे.