रत्नागिरी – रत्नागिरी नगरपालिकेच्या नवनियुक्त मंडळाची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र अपेक्षेप्रमाणेच ही पहिलीच सभा वादळी ठरली. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत पालिकेची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटल्याची धक्कादायक माहिती या सभेत उघड झाली. आजघडीला रत्नागिरी नगरपालिका तब्बल ३६ कोटी २८ लाख रुपयांची देणीदार असल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले.
दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कामकाजास सुरुवात झाली. सभेच्या प्रारंभीच नगराध्यक्षा सुर्वे यांनी प्रशासनाकडून गेल्या चार वर्षांतील आर्थिक व्यवहारांचा तपशील सादर करण्याची मागणी केली. चार वर्षांपूर्वीची आर्थिक स्थिती आणि आजची अवस्था यांची तुलना करताना प्रशासकीय काळात झालेल्या बेसुमार खर्चामुळे पालिकेवर मोठे आर्थिक संकट ओढवल्याचे समोर आले. या स्थितीचा थेट परिणाम आगामी विकासकामांवर होण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली.
अजेंड्यावरील विषयांवर चर्चा सुरू असतानाच प्रशासनाकडून मिळणारी असमाधानकारक व टाळाटाळ करणारी उत्तरे सभेतील वातावरण तापवणारी ठरली. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असताना बांधकाम विभागाचे प्रमुख गैरहजर असल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “माहिती घेऊन सांगतो” अशा उत्तरांवर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
प्रशासकीय काळात झालेल्या शौचालय बांधकामातील कथित अनियमितता, आरोग्य व स्वच्छतेच्या नावाखाली झालेल्या भरमसाठ खर्चाचा हिशेब, शहरात महानगर गॅस वाहिनीसाठी दिलेल्या खोदाई परवानग्या आणि त्यानंतर रस्त्यांची झालेली दुरवस्था, तसेच दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास व प्रशासकीय दिरंगाई यावर प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट करत, यापुढे सर्व खर्च काटकसरीनेच केले जातील, असे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी ठणकावून सांगितले. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत, “आता प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
अनेक प्रश्नांची ठोस उत्तरे प्रशासनाकडे नसल्याने सभागृहात बराच काळ गदारोळ सुरू राहिला. अखेर अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवतच रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्या कारभाराची पहिली सभा तहकूब झाली.
प्रशासकीय कालावधीत झालेल्या सर्व कामांची चौकशी लावण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिका-यांनी कामांमध्ये झालेल्या पैशांची उधळपट्टी सहन केली जाणार नाही. या पुढे पालिकेच्या खर्चात काटकसर करुन पालिकेला कर्जातुन वर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. – शिल्पा सुर्वे, नगराध्यक्ष, रत्नागिरी नगर पालिका.

