रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या आर्थिक तुटीवर उपाय म्हणून रत्नागिरी नगर परिषदेने अंत्यसंस्काराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने “रत्नागिरीत मरण महागले” अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला.

सभेत दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांच्या अंतिम संस्कारासाठी नगर परिषदेवर दरवर्षी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च होत आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर दरवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी अग्निशमन आणि दिवाबत्ती करात वाढ करण्यात आली होती. आता अंत्यसंस्काराचे दर वाढवल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आणखी आर्थिक भार पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही वाढ जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरवाढीबरोबरच स्मशानभूमीतील स्वच्छता, सुविधा व व्यवस्थापन सुधारण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. चितेसाठी लाकडे रचून देणे, परिसर स्वच्छ ठेवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दरवाढीमुळे नगर परिषदेच्या महसुलात वाढ होणार असली, तरी “मरणही आता महाग झाले” ही भावना शहरात प्रकर्षाने उमटत आहे. अवाच्या सव्वा दर वाढवून जिल्ह्यातील सर्वच पालिकांना रत्नागिरी पालिकेने मागे टाकले आहे. दापोली, खेड, चिपळूण व राजापूर या सारख्या पालिकांकडून घेतला जाणारा अंत्यसंस्कारासाठीचा खर्च खुपच नगण्य आहे. मात्र, रत्नागिरी नगर पालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी पहिल्याच सर्व साधारण सभेत अंत्यसंस्कारासाठी लागणारा कर वाढवून मेलेल्या माणसांच्या टालू वरील लोणी खाण्याचा प्रकार केल्याने याविषयी आता नागरिकांमधून संतप्त भावना उमटत आहेत.

शहरातील कचरा समस्या रोखण्यासाठी प्रभाग १ ते १६ मध्ये कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व प्रतिबंधक फलक लावण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच डास प्रतिबंधक फवारणी तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. शौचालयांच्या पाइपांवर जाळ्या बसवून डासांची उत्पत्ती रोखण्याचाही निर्णय घेण्यात आला.

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, मोकाट गुरांचा बंदोबस्त आणि शहरातील स्वच्छता मोहिम अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. शहरातून जाणाऱ्या नाल्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र सांडपाणी पाईपलाईन व्यवस्था आणि रखडलेली रस्ते रुंदीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा झाली. अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदारांना थेट नोटिसा बजावण्याचा इशाराही देण्यात आला.

सुधारित व जुने दर पुढीलप्रमाणे :

  • लाकूड चिता (शहरातील मृतदेह) – नवीन ₹१५०० जुना १०००
  • लाकूड चिता (शहराबाहेरील मृतदेह) – नवीन ₹२५०० जुना १५००
  • गॅस शवदाहिनी (शहरातील मृतदेह) – नवीन ₹१००० जुना ५००
  • गॅस शवदाहिनी (शहराबाहेरील मृतदेह) – नवीन ₹२००० जुना १०००