रत्नागिरी : पावसाने ऐन हंगामात पाठ फिरवल्याने आणि सप्टेंबरमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसल्याने रत्नागिरी तालुक्यातील भातशेती संकटात सापडली आहे. शेतात उभी असलेली भाताची रोपे हिरवी दिसत असली तरी लोंब्यांमध्ये दाणाच भरला नसल्याचे विदारक चित्र कुरतडे-कातळवाडी आणि डुगवे परिसरात पाहायला मिळत आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी केली.

कातळवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन भातपिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी आणि तीव्र उन्हामुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडली. यावेळी चंद्रकांत फुटक, कृष्णा फुटक, सदाशिव फुटक, अनिल भाटकर, मोहन फुटक, सुभाष भुवड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित बाधित क्षेत्राचे पंचनामे ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत येत्या एक ते दोन आठवड्यांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील.

बाधित क्षेत्राचे १०० टक्के पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे तत्काळ पाठवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची असल्याने त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नेटवर्कची अडचण असलेल्या भागात उपलब्ध कनेक्शनचा वापर करावा अथवा ॲपमध्ये ऑफलाइन पद्धतीने माहिती नोंदवून नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर ती अपलोड करावी, असे निर्देश देण्यात आले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यंदाच्या पावसाच्या कमतरतेचा परिणाम आगामी उन्हाळ्यात जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावनिहाय ‘वॉटर बजेटिंग’ करण्याचे निर्देश दिले. ऑक्टोबरमध्येच गावातील पाण्याचे स्रोत निश्चित करून एप्रिल, मे आणि जूनमधील संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले.

गरज भासल्यास शेतकऱ्यांसाठी विंधन विहिरी (बोरवेल) उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मिळणारी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाहणीदरम्यान भातपिकाची प्रत्यक्ष स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले. वरून रोपे हिरवी दिसत असली तरी लोंब्यांमध्ये दाणे भरलेले नसून त्या पोकळ राहिल्या आहेत. जुलै आणि विशेषतः सप्टेंबरमध्ये आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने दाणा भरण्याच्या प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे.

सामान्य परिस्थितीत भाताला १२ ते १८ फुटवे येतात; मात्र पाण्याअभावी यंदा केवळ ५ ते ७ फुटवे आले आहेत. कडा करपा, काजळी तसेच बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव वाढल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

सुमारे २५ वर्षांपूर्वी अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा त्याची पुनरावृत्ती होत असल्याची भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी कातळवाडीनंतर डुगवे परिसरातील भातशेतीचीही पाहणी करून पिकांच्या स्थितीचा आढावा घेतला.

या पाहणीवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्यासह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.