रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नामांकित परकार हॉस्पिटलमध्ये सोमवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील डायलेसिस विभागातील वातानुकूलन यंत्रणेला (एसी) शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावरील डायलेसिस रूममधील एसीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग भडकली. काही वेळातच संबंधित विभागात दाट धूर पसरल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकूण ५७ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये अतिदक्षता विभागातील (आयसीयू) सात गंभीर रुग्णांचाही समावेश होता. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करून सर्व रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे हलवले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही रुग्णाला दुखापत झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले, घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
या घटनेनंतर परकार हॉस्पिटलचे डॉक्टर अलीमिया परकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगीच्या घटनेची माहिती दिली. सर्व रुग्ण सुरक्षित असल्याचे सांगत नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
