रत्नागिरी: रत्नागिरी शहरात सध्या पेट्रोल टंचाईची भीती वाढत असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवेमुळे लोक गरज नसतानाही मोठ्या प्रमाणावर पेट्रोल भरून घेत आहेत. काही नागरिक तर थोडा वेळ फिरून आल्यावर पुन्हा रांगेत उभे राहून पेट्रोल भरताना दिसत आहेत.
दरम्यान, धक्कादायक आकडेवारी समोर आली असून रत्नागिरी तालुक्यात दररोज तब्बल १० कोटी ५४ लाख रुपयांचे पेट्रोल विकले जात आहे. पेट्रोलचा दर सुमारे १०६ रुपये प्रति लिटर असतानाही ही विक्री होत असल्याने एवढे पेट्रोल नेमके कोण आणि कशासाठी घेत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
पंप बंद, नागरिक हैराण
शहरातील परिस्थिती आणखी बिकट करणारी बाब म्हणजे काही पेट्रोल पंपांवरील अनियमित पुरवठा. अनेकदा एकाच वेळी चार-चार पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र दिसून आले. कालही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शहरात मोठा गोंधळ उडाला.
पेट्रोल पंप चालकांच्या मते, उपलब्ध साठा संपल्यावर पंप बंद करावा लागतो. कामगारांची ड्युटी रात्री १० वाजेपर्यंत असल्याने त्यानंतर पंप बंद होतात. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अफवांचा जनजीवनावर परिणाम
लॉकडाऊनच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर दररोज लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक जण अनावश्यक साठेबाजी करत असल्याने इतरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासन आणि कंपन्यांचे आवाहन
एलपीजी आणि इंधन कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की राज्यात आणि देशात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांवर कारवाईची गरज
काही लोकांच्या घबराटीमुळे संपूर्ण व्यवस्थेवर ताण येत असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई व प्रशासनाकडून नियमित पाहणी,पेट्रोल पंप व्यवस्थापनावर नियंत्रण या गोष्टी अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
एकंदरीत, रत्नागिरीतील पेट्रोल टंचाई ही प्रत्यक्षात पुरवठ्याऐवजी अफवांमुळे निर्माण झालेली समस्या असल्याचे स्पष्ट होत असून नागरिकांनी संयम राखणे गरजेचे आहे.
