रत्नागिरी : अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक गती देत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी तब्बल सुमारे ९० लाख रुपये किमतीचा जप्त अंमली पदार्थांचा साठानष्ट केला. एनडीपीएस कायद्यांतर्गत २०१९ ते २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या ११ गुन्ह्यांतील ८९ लाख ७२ हजार ५ रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार शुक्रवारी नवी मुंबईतील तळोजा येथे वैज्ञानिक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’च्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे हे समितीचे अध्यक्ष असून, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके हे सदस्य आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ११ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरीनंतर तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्ल्यूएमएल) येथे ‘इन्सिनरेशन’ (जाळण्याच्या) पद्धतीने अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. या कारवाईत १० किलो ४९ ग्रॅम गांजा, ४३ गांजाची रोपे, ९ किलो ७८ ग्रॅम चरस आणि ९२६ ग्रॅम कोकेन (युरिया) असा एकूण २० किलो ५३ ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा अंमली पदार्थसाठा नष्ट करण्यात आला.

या मुद्देमालाची एकूण किंमत ८९ लाख ७२ हजार ५ रुपये इतकी होती.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा जिल्हा पोलिसांचा निर्धार या मोहिमेतून पुन्हा अधोरेखित झाला.