रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी वर्षभरात धडक कारवायांचा सपाटा लावला असून, या मोहिमेत तब्बल ६४ गुन्हे दाखल करत ९२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ब्राऊन हेरॉईन, हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी यांसारख्या घातक अंमली पदार्थांचा १४ लाख २८ हजार ६४ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता आता तस्करीचे संभाव्य मार्ग आणि संशयास्पद ठिकाणांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या (एनकॉर्ड) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणे हे केंद्र आणि राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे, असे महामुनी यांनी स्पष्ट केले. एमआयडीसी परिसरातील संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी पोलीस आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवावी. विशेषतः बंद पडलेल्या कारखान्यांसह संशयास्पद कंपन्यांची कसून तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तीर्ण सागरी किनारा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरला जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींची नियमित तपासणी करावी. या बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी तसेच अन्य परप्रांतीय कामगारांची पार्श्वभूमी, ओळख आणि आवश्यक कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करावी, अशा सूचना महामुनी यांनी दिल्या. त्यामुळे आता सागरी मार्गावरील हालचालींवरही प्रशासनाची नजर राहणार आहे.
अंमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाज आणि सर्व शासकीय यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. पोलीस दलाने ग्रामसभांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली आहे. शिक्षण विभागानेही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. आता अन्य शासकीय विभागांनीही पुढाकार घेऊन जनजागृतीची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन करण्यात आले.
एकीकडे ९२ आरोपींना अटक करून पोलिसांनी तस्करांना दणका दिला असला, तरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणारे स्रोत, तस्करीचे मार्ग आणि त्यामागील साखळी उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान कायम आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिसांची मोहीम कितपत प्रभावी ठरते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
