रत्नागिरी : गुन्हे तपास प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यातील इतर यंत्रणांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी विकसित करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘‘रेड्स अॅप’ सध्या विद्रूप मृतदेहांची ओळख पटवणे तसेच फरार आरोपींचा शोध घेणे या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या अॅपचा उद्देश गुन्हे तपास अधिक वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
या अॅपच्या माध्यमातून जुने किंवा अस्पष्ट छायाचित्रांचे विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते. संशयित व्यक्तीचा सध्याचा चेहरा कसा असू शकतो, याचा अंदाज घेण्यास त्यामुळे मदत होते. तसेच, अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये विद्रूप झालेल्या मृतदेहांचे डिजिटल पुनर्निर्माण करून त्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
याशिवाय, गुन्हेगारांच्या जुन्या रेखाचित्रांना अधिक वास्तवदर्शी छायाचित्रांमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तपास अधिक ठोस स्वरूपात पुढे नेणे शक्य होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील या उपक्रमाची दखल घेत राज्यातील नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर या जिल्हा पोलीस दलांनीही ‘रेड्स अॅप’ चा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून अज्ञात मृतदेहांची ओळख पटवणे आणि गुन्हे तपासाला गती देणे या बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
एकूणच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे तपास अधिक परिणामकारक करण्याच्या दिशेने रत्नागिरी पोलिसांनी उचललेले पाऊल राज्य पोलीस दलासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
