रत्नागिरी – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. दापोली, खेड, रत्नागिरी, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यांत महाविकास आघाडीला जबर धक्का बसला असून, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला आहे. राजापूर शहरात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. हा काँग्रेससाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे.
चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. यादव यांच्या चिपळूणमधील ‘स्वामिनी’ निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य मान-सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही देताना यादव यांनी भाजपमध्ये संघटनात्मक शिस्त, स्पष्ट ‘व्हिजन’ आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याची संस्कृती असल्याचे अधोरेखित केले.
भाजपात प्रवेशानंतर चिपळूण नगर परिषद निवडणुकीत प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी पक्षातील नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे भाजपाचे सात नगरसेवक निवडून आल्याचे सांगितले. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी प्रवेशकर्त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत प्रशांत यादव यांना भविष्यात विधानसभेवर पाठवण्याचे आवाहन केले. भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून कुटुंब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत आमदार किरण सामंत यांनीही काँग्रेस व उबाठाला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, सुभाष बाकाळकर, ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष कुळये, पांगरेच्या सरपंच वैष्णवी कुळये, तसेच उबाठाच्या राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका प्रतिभा रेडीज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात आमदार सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत पक्षात योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली. माजी आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. एकीकडे भाजप तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असलेल्या या धडाकेबाज पक्षप्रवेशांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही फोडाफोडी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

