रत्नागिरी – खेड मधील लोटे औद्योगिक वसाहतीतील आठ उद्योगांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रदुषण मंडळाकडून कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या उद्योगांकडून सोडण्यात येणा-या सांडपाण्याचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योगांनी पावसाचा गैरफायदा घेत सांडपाणी जवळच असलेल्या नाल्यात सोडल्याने कोतवली गावातील सोनपात्रा नदीचे पाणी लालसर झाले आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाने सांडपाणी सोडणा-या आठ उद्योगांवर कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.

जिल्ह्यात काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत काही उद्योगांनी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली होती. पहाटेच्या सुमारास सोनपात्रा नदीचे पाणी लालसर झाल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांनी तातडीने प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नाल्यातील तसेच नदीतील पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले. याठिकाणी वारंवार होणारे प्रदुषणामुळे येथील आठ उद्योगांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावा नंतर या कार्याल्याकडून कोणती कारवाई होणार याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.