रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी दमदार हजेरी लावत वातावरणात मोठा बदल घडवून आणला. सकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत झालेल्या पावसामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानापासून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत सकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक बनले.

राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही भागांत रिमझिम सरी कोसळत राहिल्या. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. मात्र रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठाही काही काळ खंडित झाल्याची माहिती मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये धावपळ उडाली. अनेकांनी दुकानांसमोर ताडपत्री आणि संरक्षणाची व्यवस्था करण्यासाठी लगबग केली. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात असून आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने वातावरण पोषक बनत असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. मान्सून केरळ किनारपट्टीकडे वेगाने सरकत असल्याने कोकण किनारपट्टीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पावसामुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याचे दिसून आले. वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला. तरीही उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांनी या पावसाचे स्वागत केले असून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या मान्सून पुर्व पावसाचा आंबा व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे आंब्यांचे दर आणखीच घसरले आहे. स्थानिक बाजार पेठेत आंबा आता डझनाला १५० ते २०० रुपयावर आला आहे. चार ते सहा डझन पेटीचा दर ही एक हजार रुपयांच्या आत आल्याने आंबा व्यावसायिक हवालदील झाला आहे. काही दिवसापासुन अधून मधून कोसळणा-या पावसामुळे आंबा व काजू व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचे काम पावसाने केल्याचे आंबा बागायतदार व्यावसायिकांकडून बोलले जात आहे.