रत्नागिरी: रत्नागिरी बसस्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये आरक्षण केलेली सीट प्रत्यक्ष गाडीतच नसल्याचा अजब प्रकार उघडकीस आला. या गोंधळामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला, तर गाडी सुटण्यासही तब्बल १५ मिनिटांचा विलंब झाला. एसटीच्या बेजबाबदार कारभाराबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी-पुणे (मलकापूर मार्गे) बुधवारी रात्री ९ वाजता सुटणाऱ्या गाडीचे (क्र. एमएच-४०-एन-९८४४) एका महिला प्रवाशाने स्वतःसह दोन मुलांसाठी आरक्षण केले होते. त्यानुसार ४१, ४२ आणि ४४ क्रमांकाच्या सीटचे तिकीट काढण्यात आले होते. रात्री ८.५५ वाजता गाडी बसस्थानकात दाखल झाल्यानंतर वाहकाने प्रवाशांना आत सोडण्यास सुरुवात केली. मात्र गाडीत ४४ क्रमांकाची सीटच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.
तीन तिकिटांचे पैसे भरूनही एक सीट उपलब्ध नसल्याने काही काळ बसस्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित प्रवाशांनी एका तिकिटाचे पैसे परत देण्याची किंवा पर्यायी सीट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अखेर सुमारे १५ मिनिटांनंतर वाहकाने दिव्यांगांसाठी आरक्षित असलेली सीट संबंधित प्रवाशाला दिली आणि गाडी रात्री ९.१५ वाजता मार्गस्थ झाली.
मात्र प्रवासादरम्यान खेडशीजवळील महालक्ष्मी थांब्यावर एक दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढले. त्यांचीही तीच सीट आरक्षित असल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाला. संबंधित दिव्यांग प्रवाशाने कोणतीही तक्रार न करता काही काळ चालकाजवळील सीटवर बसून प्रवास केला. मात्र पायांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी नंतर स्वतःच्या आरक्षित सीटवर बसण्याची विनंती केली. त्यामुळे पुन्हा आसन व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
दोन लहान मुलांसह आरामदायी प्रवास व्हावा यासाठी महिला प्रवाशाने मुद्दाम बाजूबाजूच्या तीन सीटचे आरक्षण केले होते. मात्र एसटी प्रशासनाच्या भोंगळ नियोजनामुळे लहान मुलीला प्रवासभर जागा बदलत बसावे लागल्याचे सांगण्यात आले.
तिकिटाचे पूर्ण पैसे भरूनही प्रवाशांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याने एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केवळ आधुनिक बसस्थानके उभारून प्रवाशांच्या समस्या सुटत नाहीत, तर सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.
काही दिवसांपूर्वी मुंबई मार्गावरील एका एसटी गाडीतही आरक्षित सीट प्रत्यक्षात नसल्याचा प्रकार घडल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आरक्षण व्यवस्थेतील त्रुटींकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
