रत्नागिरी : ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडजवळील सुशोभीकरण केलेल्या छताचा काही भाग ५ जुलै रोजी मध्यरात्री कोसळल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वीही अशीच दुर्घटना घडली होती. एकाच कामात दुसऱ्यांदा छत कोसळल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली पूर्ण झालेल्या या कामातील छताचा मोठा भाग अचानक कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनसेने या संपूर्ण प्रकल्पाची निष्पक्ष चौकशी करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई झाल्याशिवाय हा विषय थांबणार नसल्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले. मात्र, चौकशी केवळ कागदावर न राहता दोषींवर ठोस कारवाई झाली नाही, तर ‘मनसे स्टाईल’ तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे. यावेळी रुपेश जाधव यांच्यासह चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, सुजित घाणेकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
