रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली असतानाच, पाठोपाठ राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्याने जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. एकाच दिवशी दोन न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही न्यायालयांच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाल्याचे समोर येताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. न्यायालयातील न्यायाधीश, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर श्वानपथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. न्यायालयाची मुख्य इमारत, परिसरातील वाहने आणि प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी सुरू करण्यात आली.
रत्नागिरीतील घटनेची चर्चा सुरू असतानाच राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या ई-मेलवरही बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे राजापूरमध्येही एकच धावपळ उडाली. पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने न्यायालय परिसर गाठला. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू करण्यात आली.
दोन न्यायालयांना धमकी; घातपाताचा संशय?
दोन्ही न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने हा केवळ खोडसाळपणा आहे की घातपात घडवण्याचा प्रयत्न, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यातील अन्य काही न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी पोलिसांकडून तपासणी आणि ई-मेलच्या स्रोताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तपासणी पूर्ण होऊन अधिकृत माहिती समोर येईपर्यंत बॉम्ब असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. न्यायालयांसारख्या संवेदनशील ठिकाणांना एकापाठोपाठ मिळालेल्या धमक्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
