रत्नागिरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी सुरू असलेल्या साफसफाई मोहिमेत एका कंत्राटी सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने रत्नागिरी हादरली आहे.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडाझुडपांची साफसफाई करत असताना फुरसे जातीच्या अतिविषारी सापाने दंश केल्याने काशिनाथ लक्ष्मण गोताड (रा. फगरवठार, मूळ रा. चांदोर) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाच्या नियोजनावर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान’ कार्यक्रमासाठी मैदानाची युद्धपातळीवर साफसफाई सुरू असताना ही दुर्घटना घडली. गवत आणि झुडपांमध्ये काम करत असताना अचानक फुरसे सापाने गोताड यांच्या पायाला दंश केला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र विष शरीरात वेगाने पसरल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
शासकीय कार्यक्रमासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. साफसफाईपूर्वी परिसराची सुरक्षितता तपासण्यात आली होती का? सर्पदंशासारख्या धोक्याचा विचार करून आवश्यक संरक्षण साधने किंवा वैद्यकीय तयारी करण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.दरम्यान, या घटनेनंतर भाजपाकडून मृत काशिनाथ गोताड यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, केवळ मदत जाहीर करून जबाबदारी संपते का, असा सवालही उपस्थित होत आहे.
या घटनेची अधिकृत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, शासकीय कार्यक्रमांच्या तयारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आता कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
