रत्नागिरी : शासकीय महसूल व गौण खनिज वसुली हे महसूल विभागाचे प्राथमिक कर्तव्य असून, वसुलीची सद्यस्थिती समाधानकारक नसल्याने विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक व धडक कारवाया कराव्यात, तसेच महसूल वसुलीचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, असे कडक निर्देश त्यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महसूल आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, वैशाली पाटील, आकाश लिगाडे, डॉ. विजय सूर्यवंशी, विश्वजीत गाताडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते.
गौण खनिज आणि महसूल वसुलीच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त करताना आयुक्त अगरवाल म्हणाल्या की, अपेक्षित कामगिरी झालेली नाही. जिल्ह्यात सर्व कामे नियमानुसार सुरू आहेत का, याची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. महसूल विभागाच्या मूळ कामातच ढिलाई दिसत असल्याने कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. अर्धवट कामे तसेच प्रलंबित प्रकरणे शून्यावर आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांना आपल्या कामांसाठी वरिष्ठ कार्यालये किंवा मंत्रीमहोदयांकडे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवरच पुढाकार घेऊन प्रत्येक प्रकरणाचा निपटारा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत आंबा-काजू नुकसानभरपाई अनुदान वाटप, ॲग्रीस्टॅकची कामे, बीएसएनएल टॉवरसाठी जागा वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, नवीन वाळू धोरण, अतिक्रमण नियमानुकूल करणे, वन क्षेत्राच्या नोंदी आणि लँड बँक निर्मिती आदी विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस विभागाच्या ‘मिशन राईझिंग’ अंतर्गत अधिनिर्णय, मिशन जीवन, रेड्स ॲप, मिशन रॅपिड, फिनिक्स प्रगती आणि प्रतिसाद या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल उपक्रमांचे तसेच सायबर गुन्हे नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
या अभिनव तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे कौतुक करत विभागीय आयुक्त अगरवाल यांनी रत्नागिरी पोलिसांच्या कामगिरीचे अभिनंदन केले. तसेच शासनाच्या नशामुक्ती अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे आवाहनही त्यांनी केले. २६६-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘स्वीप’ मोहिमेचा फलक प्रदर्शित करण्यात आला. ‘प्रारूप मतदार यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झाले आहे; तुम्ही तुमच्या नावाची पडताळणी केलीत का?’
या संदेशाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.या फलकावर विभागीय आयुक्त रुबल अगरवाल, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची पडताळणी करण्याचे आवाहन केले.
